Sunday, March 13, 2022

जीवन कशासाठी? स्वतःला आणि जीवनाला अधिकाधिक समजून घेण्यासाठी...

दुपारचे साडेचार वाजलेत. वातावरण छान आहे. बाहेर चकचकीत ऊन पडलय. हवेच्या मंद झुळुका अधून-मधून येतायत. ऐन हिंवाळयातली दुपार असल्यामुळे हवेत सुखद गारवा आहे. जवळच्या आंब्याच्या झाडावर एक कोकीळ हळूच कुक-कुक्क, कुक-कुक्क असा काहीसा आवाज करत बसलाय. घरामध्ये सुद्धा एक आवाज नेहमीप्रमाणे अविरत घुमतो आहे. आमच्या आईचा...

तिचं भाषणवजा स्वगत नेहमीप्रमाणे सुरु आहे. तशी आता त्याची सवयच झाली आहे मला. इथे देवगड मध्ये राहायला आल्यानंतरच हा प्रकार सुरु झाला. जवळजवळ दहा वर्ष झाली. खरच वाटत नाही. मी रोज हि अखंड बडबड ऐकतोय. मुंबईला हा प्रकार नव्हता. म्हणजे तिचा मानसिक प्रॉब्लेम होता. पण अस एकटीने, काल्पनिक पात्रांबरोबर अखंड बोलण नव्हत. इथे मी तिच्याबरोबर एकटाच राहत असल्यामुळे तिच हे अविरत भाषण माझ्या जीवनाचा जणू अविभाज्य भागच बनून गेलय. बट एनीवे. त्याबद्दल अधिक नंतर केव्हातरी.

तर पहिल्या पोस्टमध्ये मी हा ब्लॉग मुख्यत्वे स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी लिहायचा असं म्हणालो. खरच, हि गोष्ट केवळ या ब्लॉग पुरतीच नाही तर एकूणच आपल्या जीवनाला लागू आहे, नाही का? निदान माझ्या जीवनात तरी हि गोष्ट शिकण हेच एक मोठं आव्हान असत आलय. जणू मुख्यत्वे ते शिकण्यासाठीच मी हा जन्म घेतलाय आणि प्रत्येक दिवशी मी हीच गोष्ट अधिकाधिक शिकतोय असं म्हटल तर काही अतिशयोक्ती होणार नाही.

लोकांच्या मताला, प्रतिक्रियेला असं अवाजवी महत्व देण, इतक कि त्याने आपलं जीवनच झाकोळून जावं, हि एक मानसिक समस्या आहे, हे मला जवळ-जवळ पंचवीस वर्षांपूर्वी माहित झालं. माझ्या या ब्लॉगमध्ये त्याबद्दल अधूनमधून, कळत-नकळत उल्लेख येतच राहील कारण, हि समस्या माझ्या जीवनात मध्यवर्ती असत आली आहे. इतर अनेक समस्या त्यातून निर्माण होत गेल्या आणि जर हि एक मानसिक समस्या नसती तर इतर अनेक प्रॉब्लेम्स कदाचित निर्माणच झाले नसते असं मला तरी नक्कीच वाटत.

पण आपल्या जीवनातल्या ज्या काही समस्या असतात, परिस्थिती असतात त्या आपल्याला अधिक प्रगल्भ बनवण्यात हातभार लावतात हेसुद्धा खरच. कारण त्या समस्या आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतात. स्वतःबद्दल, जीवनाबद्दल विचार करायला लावतात. आणि त्यातून आपण हळूहळू मनाने अधिक जागरूक आणि कणखरच बनतो, नाही का?

पहिली वहिली पोस्ट.........

चला माझ्या पहिल्या-वहिल्या मराठी ब्लॉगची सुरुवात तर झाली. शेवटी मातृभाषेतून लिहिण्याचा आनंद आणि आत्मविश्वास काही आगळाच असतो हे खरच!

काय लिहायचे ते मात्र अजून तरी नक्की नाही. मनातले विचार मोकळेपणे व्यक्त करण्याचं एक माध्यम किंवा ठिकाण म्हणून या ब्लॉगचा उपयोग होईल. तेसुद्धा मराठीमधून! त्याचा आनंद घ्यायचा. मजा अनुभवायची. कोणाला वाचावासा वाटेल किंवा नाही याची जास्त फिकीर करत बसण्यात काही अर्थ नाही.

कारण मग मी जे लिहीन ते कदाचित तितकस प्रामाणिक राहणार नाही. मी लिहीलेलं वाचणाऱ्याला आवडेल कि नाही याचाच एक प्रकारचा ताण मनावर राहील. आणि अशी जाणीव सारखी मनात राहिली तर मग प्रामाणिक सेल्फ-एक्स्प्रेशन कसं शक्य होणार?

म्हणून निदान हा ब्लॉग तरी फक्त स्वतःच्या विचारांच्या प्रामाणिक अभिव्यक्तीसाठी आणि त्यातल्या निखळ आनंदासाठीच केवळ लिहायचा एवढी गोष्ट मात्र नक्की. अर्थातच कोणाला त्यात काही इंटरेस्ट वाटलाच तर चांगलच आहे. माझ्या विचारांवर त्यांच्या काही प्रतिक्रिया समजून घ्यायला मलासुद्धा आवडेल.